सोमवार, ७ मे, २०१८

जेव्हा ती घरभर........!

 संबंधित इमेज

जेव्हा ती घरभर वावरते दिवसभर

घराच्या भिंती घराचे छत आणि घराचे फ्लोअर...

यांचेच वेध घेऊन सजवत असते

गादी आणि उशांचे कव्हर ....!

घराला कितीही आवरलं सावरलं

तरी भरत नाही तिेचे मन ......

कोप-यातलं जळमट, भिंतींचा उडालेला रंग

मिटवत नाहीत घराचं घरपण....

तरी कावरी बावरी होते तिची नजर.....!

घराबाहेर असली तरी

डोळ्यात  भरून नेते घर .....

कुठे गैस लाईट पंखा चालू तर नाही गिझर...?

आतली नजर फिरून येते भरभर......

जेव्हा ती घरभर वावरते दिवसभर...!

घर तिच्या सोबत तिच्या आत असते.....!

कधी पाठीवर तर कधी मानगुटीवरही बसते.....

घराला घरपण देताना रोजच दमते भागते

तरी उंब-यातल्या रांगोळीत रंग भरून

स्वत :ला सिद्ध करीत असते..!

घराला लागते धाप जेव्हा ती थकते

घर चिडते, ओरडते जेव्हा ती चुकते

अनं एक दिवस ...

घर थांबते ....अस्ताव्यस्त होते...

घराचे घरपणही जाते.....

घर झुरते....

घर रडते.....

जेव्हा ती घरभर वावरत नसते दिवसभर.....!!!


@ समिधा
ओली हाक...... !


  

काल तुला पुन्हा हाक मारली

ऐकलीस नं....?

तुला किंचीत ह...ल...क...सा... स्पर्श झाला असेल

आत तरंग उठला असेल....

आणि माझी अलवार आठवण झाली असेल .....!

झाली नं...?

तू बोलत नसलास तरी

इथे  मला कळते....

तुझी हाक मी नेहमीच ऐकत असते ....

झोपण्यापुर्वी बंद डोळ्यात

तुझा रिकामा कॅनव्हास माझ्याच मनातल्या अनेक

मुर्त प्रतिमांनी भरून घेत

डोळे मिटून घेते ......

आणि सकाळी डोळ्यात साठलेेले

ह्रदयात उतरलेल्या तुझ्या अस्तित्वाला

सोबत घेऊन आजही जगते ......

तुझ्या हाकेतला ओलावा

अजुनही ओला आहे.....

कालची माझी हाक अशीच ओली होती

ऐकलीस नं....?


@ समिधा

शनिवार, ५ मे, २०१८

"कविता" जशी माझी तशी तुझी पण आहे नं.........!

pascal romantic painntings साठी इमेज परिणाम
 एेक नं.....

काल मी एक बासरी आणली

हं.... माहित आहे

मला कुठे वाजवता येते

पण- तुला तर येते नं........

तू जवळ असल्याचा एवढा दिलासा खुप आहे नं.....!

एेक नं

त्या दिवशी सुर्याशी

खुप खुप भांडले

संध्याकाळच्या कातरवेळी उगाच

रंग खुलवीत असतो

असं निघायच्यावेळेला कुणी

एवढं लाडात येतं.....?

मग अख्खी रात्र हुरहुरते नं.....

जागरणाचा त्रास त्याला नाही मला होत आहे नं.....!

एेक नं..........

अंगणात चाफ्याची

एक कळी फुलली होती

लाडीगोडी लावून थोडं खेळून

तुझ्यासाठी खुडली होती

पण  अस्वस्थ झाले नं ......

झाडापासून कळीला मी दूर  केल आहे नं........!

एेक नं..........

तुझ्या मौनाला धडकून

सारी अक्षरं खाली पडतात

तीच ही अक्षरं

कवितेत कशी सावरतात  !

तुही काही बोल की

तुझ्याकडे शब्द नाहीत असं नाही नं.......

"कविता"  जशी माझी तशी तुझी पण आहे नं.........!

@ समिधा


गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

ती भुल कोवळी .....!तुझ्या मंद स्मृतींचे 

चांदणे अवतरता भवताली ......!

ती भुल कोवळी स्मरता

हळुवार स्पंदने शहारली ....!


@ समिधा

तुझ्या आर्त


    

तुझ्या आर्त वेदनांचा

शब्द व्हावा मी....

निथळत जावोत त्यातून

सारे दु:खांचे देणे......!

अनं....

मायेनं ओथंबून गावे

ओल्या मेघांचे गाणे.....!


@ समिधा

शनिवार, १७ मार्च, २०१८

तू जेव्हा . . .!


तू जेव्हा बोलत नाहीस
माझे शब्द रूक्ष
कोरडे म्हातारीच्या
केसांसारखे भुरभूरत
राहतात अस्ताव्यस्त ...!

तू जेव्हा भेटत नाहीस...
माझे शब्द होतात
टणक दगड
पडून रहातात मनाच्या
तळाशी निपचीत..!

तू बोल नं
म्हणजे माझे शब्द होतील
पाण्याने गच्च भरलेल्या
काळ्या ढगांसारखे....
बरसतील...!
रिमझीमतील....
नितळ स्फटीक होऊन
पानाफुलांवर झुलतील
चमकतील....
जमीनीत रूजतील
जन्मतील नवे होऊन....!

तू भेट नं
म्हणजे माझे शब्द
सप्तरंगी फुलपाखरं होतील
उडतील
बागडतील
नाचतील
डोलतील....
हळूच माझ्या शब्दांत
सतरंगी रंग भरतील....!

तुला कळतंय का
तू बोलावास...
तू भेटावास....
म्हणून माझे शब्द
क्युटसं हसून तुझ्याकडे
पहातायत...
चांदण्यांनी चंद्राकडे
लाडाने पहावे तसे....!

समिधा

😚😊

प्रिय. ❤ आपलं नातं ....

 

 Image may contain: one or more people, tree, sky, outdoor and nature

 प्रिय.
आपलं नातं
म्हणजे उभे आडवे धागे...
आपणच एकतानतेनं शोधलेलं नातं...
खरं तर हे एकप्रकारचं अध्यात्मच आहे...
दोन प्राण पण अद्वैताचा अनुभव देणारं...
असं नातं जे एकात्मतेनं गुंफावं , विणावं लागतं...
एखादा धागा रूसलाच, तुटलाच तर
दुस-यानं...
समजूतीनं, प्रेमानं ,मायेनं जोडून घ्यावा लागतो ...
शेवटी नात्याचं रेशीम वस्र म्हणजे ....
आपणच ..... उभे आडवे धागे!

 

समिधा