बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

भरजरी नातं...!



 

 

 

इतकं कसं जीर्ण झालं
तुझं माझं नातं...?
कळलंच नाही ...
तलम मुलायम नात्याला
कसर केव्हा लागली ...?
उसवतय ते आपल्याही नकळत!
कित्ती कित्ती मिरवलय
हातात हात घालून
हे भरजरी नातं...!


आजकाल मात्र
भर मांडवात
हे कसर लागलेलं नातं
लपवतांना चेह-यावरचा ताण
स्पष्ट दिसतोय....
इतकी जीर्ण झालीय का
नात्याची वीण की,
समजुतदार धागेही
घट्ट बीलगत नाहीत
आता नात्याला...!!
प्रेम विश्वासाच्या डांबरगोळ्यांवर
नात्याला गृहीत धरून जपत आलो
आपणच एकमेकांच्या सप्तरंगी
अपेक्षांमध्ये नेहमीच घट्टमुट्ट
बांधत आलो ....!!
खरंतर मध्ये मध्ये नात्याला
ऊन दाखवायला हवे होते
एकमेकांच्या स्वच्छ भविष्याचे
आणि मोकळी हवा श्वासही
घेऊ द्यायला हवा होता
आपआपल्या स्वप्नांच्या बाल्कनींत ..!
मग पुन्हा पुन्हा लपेटलो असतो
एकमेकांच्या धाग्यात घट्टमुट्ट
एकाच तलम मुलायम भरजरी नात्यात ....!!

                                                      

                                                    "समिधा "

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

तू ...........



तू खुळा सावळा मनाचा विसावा

तू पहाटवारा अंगास  झोंबणारा

तू दवात नाहलेला ओला शहारा

तू श्वास सुगंधी हृदयातच असावा    !!

 

तू श्रावणहिरवा पाचू मनी ठसावा 

तू पाण्यातला स्वच्छ तरंग नवासा 

तू स्वप्नातल्या सुखाचा कवडसा 

तू इथे तिथे अवती भवती असावा    !!

 

तू अथांग चंचल सागर दिसावा

तू अव्यक्त निःशब्द निनावी कोरा

तू घनदाट कोळोखातला ध्रुवतारा

 तू फ़क्त माझा आणि  माझाच असावा    !!

                                                   "समिधा"  

 

 

 

 

 

 

 

 

 

तो बाहेर ... ती आत ...




 

 


 दोघे एका गाडीचे प्रवासी 

 तो बाहेर ... ती  आत  ...

आणि दुनिया  उभी  दारात  ...!!

 

                                               " समिधा " 

 

 

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

होऊ नकोस पुन्हा, ती द्रौपदी ती सीता ...!!


वेलिलाही वाटे आता

आईपणाची भीती

कळ्यांना  सांगे  नका

गंधाळु  फुलण्याआधी ...!!

 

की सांगावे कळ्यांना

उमलू नकाच केंव्हा ....

कळणार नाही तुम्हां 

कुस्करल्या जाल  केव्हा ...!!

 

मी रोज पहाते बाजारी

तुडवलेल्या कळ्यांना 

अनं निर्माल्य झालेल्या

घरातल्या फुलांना ....!!

 

देव्हारी पुजली कधी 

सरणांवर उधळली

योनी भोगांचेही भोग

त्यांच्या थोपलेले भाळी..!!

 

यावे कुणीही आणि

त्यांना चुरगाळून जावे

छिन्नविछीन्न पाकळ्यांना

इथस्थता  फेकावे ...!!

 

हे संपणार कधी

कळ्यांचे कुस्करणे

उमलावे की नाही  

की गर्भातच मिटणे ...!!

 

तरीही वेल सांगे 

गर्भातल्या कळिला

तू उमल गंधाळून

स्मरून तव सृजनाला  ...!! 

 

तू जननी  तू साधवी 

तू लखलखती सौदामिनी

या केवळ उपमांनी 

नको भाळूस  तू रमणी  ....!!

 

तू फुलवावे अंगार

तूझी गाजावी गाथा 

होऊ नकोस पुन्हा 

ती द्रौपदी ती सीता  ...!!

 

                                   " समिधा "

 























  





तू उमलतो मनामध्ये .....!!




आर्त आर्त एकांती

स्पर्श मुलायम काळोखी

रात्र हळवी जागत असते ....!!

स्वप्न नक्षत्री सजवत तेंव्हा... 

तू उमलतो मनामध्ये  .....!!.....!!


                                "समिधा "

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

वाड्मयचौर्य.....!!



Image result for marathi shabd


इथे सुरांना रडताना पाहिले मी!

वेदनां बाजारी विकताना पाहिले मी ....!


तयांचा चेहरा खोटा , शब्दही खोटे

दुनियेला त्यांच्यासवे फसताना पाहिले मी.....!


शब्द चोरून गाजवले किती मुशायरे

अंतरी तयांना न लाजताना पाहिले मी....!


हा शोर कशाचा माझ्याच ठायी

शब्द माझेही लुटताना पाहिले मी....!!



                                                    "समिधा"

बुधवार, २० जुलै, २०१६

अबोली .......!!

 

मी उडवतो जेंव्हा 
शब्दांचे थवे  काही 
तू होतेस अबोली 
नजरेत निथळते काही


तू बोलावे काही 
असे काही नाही 
मी ऐकतोच तुझे 
तरंग मनाचे डोही 


                                       "समिधा"