माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६
तू उमलतो मनामध्ये .....!!

आर्त आर्त एकांती
स्पर्श मुलायम काळोखी
रात्र हळवी जागत असते ....!!
स्वप्न नक्षत्री सजवत तेंव्हा...
तू उमलतो मनामध्ये .....!!.....!!
"समिधा "
शुक्रवार, २९ जुलै, २०१६
बुधवार, २० जुलै, २०१६
मंगळवार, १९ जुलै, २०१६
" ती ..............."
कित्येक रात्री ओशाळ जागते ती
ओढून रात्र , आत रडते ती ...!!
ते शृंगारून जातात रात सारी
आवरत राहते मनाचे पसारे ती...!!
कुणी भरावा गाभा रित्या प्रेमाचा
निखारे वासनेचे किती विझवी ती ...!!
हा जन्म गेला फुकाचा तरीही
जगण्यात मोक्ष कुठे शोधते ती...!!
ती जाळते शरीर धुमसते आतून
जीवात्म्याच्या त्वचेला किती जपेल ती ...???
" समिधा "
सोमवार, ११ जुलै, २०१६
तू अव्हेरून गेलास जेव्हा
कितीक मरणे जगत होते...!!
उभ्या शरिरा कवटाळीत एकटी
कितीक हुंदके जाळले होते...!!
मागच्या अंगणी प्राजक्ताला
कवेत घेऊन रडले होते...!!
किती आकांत मनात होता
प्राणांत श्वास थरथरले होते...!!
तू फिरूनी परतून येता
मी शांत निच्छल नि:शब्द होते...!!
आत आत माझ्या परंतू
शेकडो जन्मांचे भांडण होते...!!
माफ तुला मी सहज केले
प्रेम तुझ्याहून महान होते ....!!
"समिधा"
रविवार, ३ जुलै, २०१६
तशी तुझी आठवण ...!

आकाश ढवळून वारा
पाऊस घेऊन येतो
तशी तुझी आठवण ...
मला ढवळून जाते...
असं ढवळणं बरं नाही...
त्याच्या सोबत राहून
मागचं गाणं गुणगुणत
तुझ्या पावसात भिजणं बरं नाही....!!
सारं मला कळतं,
वेळ आता निघून गेली ...
तरी मागच्या पानावर
ठेवलेली रेशीमखुण
मनातच रूतलेली
त्या गहि-या वेळांची
गाठ न सुटलेली ...
त्या वेळां, त्या खुणा
असं जपणं बरं नाही...
भुतकाळाच्या बोटांनी
वर्तमानाच्या पाठीवर
तुझं नाव गिरवणं बरं नाही.....!!
" समिधा "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या
(
Atom
)