बुधवार, १२ जानेवारी, २०२२

काय कुठे काही आपल्यात उरले आहे ?

 May be a black-and-white image of one or more people
 
प्रिय .....❤

काय कुठे काही आपल्यात उरले आहे ?
प्रश्न भिरभिरत ओठांत येते
अन् मन वादळात भरकटत जाते.
तेव्हा आठवते, पिंपळवडाच्या पारंब्यांखाली
घालवलेली ती संध्याकाळ
हातामध्ये हात आणि मंदीरातला घंटानाद
याच ओठांवर होता तेव्हा थरथरीचा साज!
अन् डोळ्यांत उसळलेली मादक गाज..!
चांदण्यांनी लपटलेला तो मधाळ अंधारातला सहवास
ते स्पर्शातले अलगद गुंफलेले श्वास...
आणि हलकेच सोडवलेले अनेक प्रश्नांचे त्रास!
कुठे होते तेव्हा तुझे माझे काही नाते...
तरी करीत होतो एकमेकांत संवेदनांना रिते..!
कुठे होती तेव्हा ही वेळ नावाची गस्ती
तुझ्यामाझ्यात होती तेव्हा फक्त तुझीमाझी वस्ती
भेटीला सुख म्हणावे , विरहाला दु:ख
एवढेच भान होते बाकी होतो मख्ख
काय बदलले रे एवढयात....
अवकाश तूझे तू निवडले...अन् माझे मी
केली तक्रार तू नाही, केली नाही मी..!
इतक्या समजूतदारपणेे एकमेकांना सांभाळले
हे सांभाळणेच मला वाटतं कुठेतरी चुकत गेले
व्यक्त होण्यापूर्वीच माझे मन तुला उमजत गेले
मात्र काही उसासे तुझ्या माझ्या नकळत निसटून गेले
त्या निसटून जाण्यातच काही तरी सुटून गेले
तुझेमाझे नाते तिथेच थोडे फसले आहे
खरं सांग...
जितके आधी जपले....
आता काही ऊरले आहे?
अनुत्तरीत प्रश्नांशिवाय .....
बाकी सारेच संपले आहे?

© pk


 
 
 
bindi love 
 
 
प्रिय...❤

तुला माझ्या प्रेमकविता निरर्थक वाटत असतील ना..?
खरं तर कवितेत तू असतोस... मी असते
तिथे तुझ्या हातात माझा हात असतो..
स्पर्शा-अस्पर्शातून संवेदनांचा संवाद असतो,
कधी जीवापाड एकमेकांना पांघरून....
मिठी, चुंबन, शृंगार असतो...!
आणि तरीही .......
तिथे *संयोग* नसतो....!
युगानूयुगे थांबलेल्या राधेचा
तो *वियोग* असतो....!

© pK ✍️

इथे काय आहे तुझ्यासारखे..

No photo description available. 

 प्रिय....❤

इथे काय आहे तुझ्यासारखे
कुठे सांग आहे कृष्णसावळा...!

कशाने भरावी तुझी पोकळी
निर्वात नश्वर जीवनसोहळा...!

यमुना किनारी रेखील्या रेषा
रेषांत दावील्या तू स्वप्नमाळा...!

रिझवून भिजवून सोडून गेल्या
प्राक्तनी नसाव्या त्या सांजवेळा...!

नको ठेवू भास माघारी आता
भासात जपू किती जीव्हाळा..!

दूर लुप्त झाली बासरीची धुन
सांग रमावा कसा जीव खुळा..!

क्षितीजापार केलास सलोखा
तरी विद्ध राधेचा सुटेना लळा !

इथे काय आहे तुझ्यासारखे
कुठे सांग आहे कृष्णसावळा...!

© pK ❤

 

black and white 

 प्रिय...❤

ते दिवस किती छान होते
दिवसांना झुंबर...
अन् रात्रीस पैंजण होते...!

एक चंद्र आजही अंगणात येतो
तो चंद्र कुठे आहे
जो रोज स्वप्नात येतो...!

ओठांनी टिपले होते
मधाचे पोळे
मधुडंख अजूनही तो सलतो येथे...!

तू सोडलेस अशा पैलतिरी
जिथे तुला
गुणगुणने अवघड होते....!

तू भेट पुन्हा एकदा
पहाट धुक्यात,
मुग्ध विमल मी, अधिर वाट पहाते...!

© pK ❤✍️


 

मंगळवार, ९ जुलै, २०१९

भंगल्या सुखांची......





भंगल्या सुखांची मी घडी केली
अनं आयुष्याच्या उशाशी ठेवत गेली  !

दु:खांना दुखावले मी कधीच नाही
दु:खातही हसण्याची करामत केली   !

कितीदा बजावले मी मनाला तरी
पुन्हा  पुन्हा इच्छांची तोरणे बांधली   !

माझ्याच वळचणीला मी अनोळखी
गर्दी कुणा दुस-यांचीच दारात पाहिली   !

मुक्त व्हावे त्याच्यातुनी मी खुपदा ठरवते
फक्त त्याची सय येता पुन्हा जाते बांधली   !


@ समिधा

Abida Parveen Aahat Si Koi Aaye To

नि:स्तब्ध व्याकुळ.......



 Digital Illustration Pascal Campion


 इथे.......
डोळ्यात माझ्या तू जागा
तिथे.......
डोळ्यात तुझ्या मी जागी
अनं समोर ....
नि:स्तब्ध व्याकुळ रात्र उभी....!


@समिधा

कुणी कुणासाठी......

 pascal paintings साठी इमेज परिणाम


 कुणी कुणासाठी थांबत नाही
सोबतीला नुसती जत्रा......!
रक्तात प्रेम गोठत नाही
दु:खावर हलकी मात्रा.....!

'असणे' च आपुले 'अस्तित्व' खरे
'असण्याचा' च शोध घ्यावा
तोच  'मोक्ष'  मित्रा ....!


@ समिधा

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

सावल्यांचे थवे .............

सावल्यांचा खेळ साठी इमेज परिणाम

सावल्यांचे थवे  कोवळे 
उतरले  अंगणात.....
जणू...
श्रीसख्याचे भास  सावळे 
अवतरले  उंब-यात.........!! 

@ समिधा 

गुरुवार, ५ जुलै, २०१८

प्रिय...दिवस सुरू होतांना......!


 Beautiful painting.....

 प्रिय.......
रात्री पापण्या जड होतात  अनं  मग मनात तू दाटून येतोस....
खुप व्याकूळ असतं मन .....अनं  मनाला त्या शरीराचं भानही नसतं....!
पांघरूणाच्या आड पापण्या ओलावतात
त्या गारव्यातच स्वत:ला मिटून घेतात
स्वप्नांचे पंख मग त्यांना रात्रभर हवा देत रहातात.
पहाटेला जड पापण्या उघडताच .....
मनाच्या तळाशी असलेली तुझी लाट अधिर होऊन वर येते
अनं दिवसभर तिचे तरंग हेलकावत रहातात........
त्या तरंगांना कधी एखादी गाण्याची धुन, शब्दांचं गुंजन
कधी तुझंच स्मरण मंद हसवत रहातात.......!
जेव्हा एखादा रिक्त क्षणही तुझ्या स्मरणानं भरून ओसंडत असतो.....
तेव्हा तुझी ओढ अनावर होते....
तुला येऊन बिलगावं.......
अनं  हे सारं सांगावं असं वाटत असते.......
पण क्षणात व्याकुळ मनाला आवरून घेते......
अनं मग असे संवेदनांना शब्द फुटतात.......
प्रिय ..... तुला कळतंय ना......
याला काय म्हणतात.............!

@समिधा

गुरुवार, ७ जून, २०१८

पाऊसधून.............















दिल्या घेतल्या श्वासांमध्ये
पाऊसधून तरंग  होते
दुर तिथेही सुर गुंफले
अल्लद अल्लद विलगत होते ....!

थेंब थेंब ईथे मोहरती
पानांवरती नक्षी सजते
दुर तिथेही तळहातावर
ओली मेंदी सलज होते .....!

धुंद कुंद मोहमयी हवेत
तरल मनाचे होती गुंते
दुर तिथेही कोमल ह्रदयी
हळवी कोवळी दंगल होते .....!

पानोपानी वेढून पाऊस
ओली चिंब वेल निथळते
दुर तिथेही सजल नयनी
नवथर पहिली थरथर होते .....!

@ समिधा 

सोमवार, ७ मे, २०१८

जेव्हा ती घरभर........!

 संबंधित इमेज

जेव्हा ती घरभर वावरते दिवसभर

घराच्या भिंती घराचे छत आणि घराचे फ्लोअर...

यांचेच वेध घेऊन सजवत असते

गादी आणि उशांचे कव्हर ....!

घराला कितीही आवरलं सावरलं

तरी भरत नाही तिेचे मन ......

कोप-यातलं जळमट, भिंतींचा उडालेला रंग

मिटवत नाहीत घराचं घरपण....

तरी कावरी बावरी होते तिची नजर.....!

घराबाहेर असली तरी

डोळ्यात  भरून नेते घर .....

कुठे गैस लाईट पंखा चालू तर नाही गिझर...?

आतली नजर फिरून येते भरभर......

जेव्हा ती घरभर वावरते दिवसभर...!

घर तिच्या सोबत तिच्या आत असते.....!

कधी पाठीवर तर कधी मानगुटीवरही बसते.....

घराला घरपण देताना रोजच दमते भागते

तरी उंब-यातल्या रांगोळीत रंग भरून

स्वत :ला सिद्ध करीत असते..!

घराला लागते धाप जेव्हा ती थकते

घर चिडते, ओरडते जेव्हा ती चुकते

अनं एक दिवस ...

घर थांबते ....अस्ताव्यस्त होते...

घराचे घरपणही जाते.....

घर झुरते....

घर रडते.....

जेव्हा ती घरभर वावरत नसते दिवसभर.....!!!


@ समिधा




ओली हाक...... !






  

काल तुला पुन्हा हाक मारली

ऐकलीस नं....?

तुला किंचीत ह...ल...क...सा... स्पर्श झाला असेल

आत तरंग उठला असेल....

आणि माझी अलवार आठवण झाली असेल .....!

झाली नं...?

तू बोलत नसलास तरी

इथे  मला कळते....

तुझी हाक मी नेहमीच ऐकत असते ....

झोपण्यापुर्वी बंद डोळ्यात

तुझा रिकामा कॅनव्हास माझ्याच मनातल्या अनेक

मुर्त प्रतिमांनी भरून घेत

डोळे मिटून घेते ......

आणि सकाळी डोळ्यात साठलेेले

ह्रदयात उतरलेल्या तुझ्या अस्तित्वाला

सोबत घेऊन आजही जगते ......

तुझ्या हाकेतला ओलावा

अजुनही ओला आहे.....

कालची माझी हाक अशीच ओली होती

ऐकलीस नं....?


@ समिधा

शनिवार, ५ मे, २०१८

"कविता" जशी माझी तशी तुझी पण आहे नं.........!

pascal romantic painntings साठी इमेज परिणाम
























 एेक नं.....

काल मी एक बासरी आणली

हं.... माहित आहे

मला कुठे वाजवता येते

पण- तुला तर येते नं........

तू जवळ असल्याचा एवढा दिलासा खुप आहे नं.....!

एेक नं

त्या दिवशी सुर्याशी

खुप खुप भांडले

संध्याकाळच्या कातरवेळी उगाच

रंग खुलवीत असतो

असं निघायच्यावेळेला कुणी

एवढं लाडात येतं.....?

मग अख्खी रात्र हुरहुरते नं.....

जागरणाचा त्रास त्याला नाही मला होत आहे नं.....!

एेक नं..........

अंगणात चाफ्याची

एक कळी फुलली होती

लाडीगोडी लावून थोडं खेळून

तुझ्यासाठी खुडली होती

पण  अस्वस्थ झाले नं ......

झाडापासून कळीला मी दूर  केल आहे नं........!

एेक नं..........

तुझ्या मौनाला धडकून

सारी अक्षरं खाली पडतात

तीच ही अक्षरं

कवितेत कशी सावरतात  !

तुही काही बोल की

तुझ्याकडे शब्द नाहीत असं नाही नं.......

"कविता"  जशी माझी तशी तुझी पण आहे नं.........!

@ समिधा


गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

ती भुल कोवळी .....!



तुझ्या मंद स्मृतींचे 

चांदणे अवतरता भवताली ......!

ती भुल कोवळी स्मरता

हळुवार स्पंदने शहारली ....!


@ समिधा

तुझ्या आर्त


    

तुझ्या आर्त वेदनांचा

शब्द व्हावा मी....

निथळत जावोत त्यातून

सारे दु:खांचे देणे......!

अनं....

मायेनं ओथंबून गावे

ओल्या मेघांचे गाणे.....!


@ समिधा

शनिवार, १७ मार्च, २०१८

तू जेव्हा . . .!


तू जेव्हा बोलत नाहीस
माझे शब्द रूक्ष
कोरडे म्हातारीच्या
केसांसारखे भुरभूरत
राहतात अस्ताव्यस्त ...!

तू जेव्हा भेटत नाहीस...
माझे शब्द होतात
टणक दगड
पडून रहातात मनाच्या
तळाशी निपचीत..!

तू बोल नं
म्हणजे माझे शब्द होतील
पाण्याने गच्च भरलेल्या
काळ्या ढगांसारखे....
बरसतील...!
रिमझीमतील....
नितळ स्फटीक होऊन
पानाफुलांवर झुलतील
चमकतील....
जमीनीत रूजतील
जन्मतील नवे होऊन....!

तू भेट नं
म्हणजे माझे शब्द
सप्तरंगी फुलपाखरं होतील
उडतील
बागडतील
नाचतील
डोलतील....
हळूच माझ्या शब्दांत
सतरंगी रंग भरतील....!

तुला कळतंय का
तू बोलावास...
तू भेटावास....
म्हणून माझे शब्द
क्युटसं हसून तुझ्याकडे
पहातायत...
चांदण्यांनी चंद्राकडे
लाडाने पहावे तसे....!

समिधा

😚😊

प्रिय. ❤ आपलं नातं ....

 

 Image may contain: one or more people, tree, sky, outdoor and nature

 प्रिय.
आपलं नातं
म्हणजे उभे आडवे धागे...
आपणच एकतानतेनं शोधलेलं नातं...
खरं तर हे एकप्रकारचं अध्यात्मच आहे...
दोन प्राण पण अद्वैताचा अनुभव देणारं...
असं नातं जे एकात्मतेनं गुंफावं , विणावं लागतं...
एखादा धागा रूसलाच, तुटलाच तर
दुस-यानं...
समजूतीनं, प्रेमानं ,मायेनं जोडून घ्यावा लागतो ...
शेवटी नात्याचं रेशीम वस्र म्हणजे ....
आपणच ..... उभे आडवे धागे!

 

समिधा 

🌹प्रिय कृष्णसखा....🌹



 Radha krushna paintings साठी इमेज परिणाम

  प्रिय कृष्णसखा....🌹

किती अद्भूत असतात हे ऋणानुबंध ....

जिथे शब्दांची गरज नसते ...

फक्त परस्परांच्या स्पंदनांचा स्पर्श असतो .....

संवेदनांची जाणीव असते...!

आणि अलगद आल्हाद उलगडत जाणारे मनातले भाव असतात....

जे परस्परांनाच कळतात....

आणि मग दोन अद्वैत प्राण आश्वस्थ होतात ....

एकमेकांच्या ह्रदयात....!

तु माझ्या सोबत आहेस हाच दिलासा जगण्यास उत्साह देतो!

म्हणूनच मी आश्वस्थ आहे

तुझ्या व माझ्या सोबत असलेल्या प्रत्येकावर,

प्रत्येक क्षणांवर तितकंच प्रेम करते जितके तू करतोस...!

समिधा