बुधवार, १० डिसेंबर, २०१४

आज कित्ती कित्ती दिवसांनी ....!!



 


आज कित्ती कित्ती दिवसांनी भेटतोस   ....!!
आणि  असा काय  पाहतोस   …?
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का केलंस  …??

हं   …
मोग-याला ओंजळीत घेऊन चुंबताना
धुँवाधार पावसाला मिठीत घेऊन  भिजतांना
चंद्राकड़े एकटक पाहुन   …
हळूच त्याला फ्लाइंग किस  देतांना  ....
तू मला पाहिलं तर नाहीस   ....?
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का
केलंस   ....??

 हं  …
कित्ती कित्ती तुला मी सर्च केलं
पण ... कुठे नाही भेटलास  ....
मग तू कधी मोग-यांच्या पाकळ्यांत
पावसाच्या मिठीत गवसलास
तर कधी चंद्राच्या कुशीत दिसलास   … !!

हं  ....
इतका रे कसा तू जेलस   …!
इतकंच का मला तू ओळखलंस   ....?
म्हणूनच का मला  टाळलंस  …
म्हणूनच  आले तुझ्या स्वप्नात   ....!!
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का केलंस   ....??

                                 "  समिधा  "

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

तरिही ... बाकी … काही …!!!




















स्वप्नात  .... तुझ्याशी
हसले  ……  जराशी
तरिही  ….... उराशी
उरले   …… काही   …!!!

उन्मळून …. पडल्या
वेदना  …....  सा-या
तरिही   ..... . मुळाशी
बाकी   …....  काही   …!!!


                                       " समिधा "

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

सांग कसे विसरायचे त्या हळुवार क्षणांना …!!





















सांग कसे
विसरायचे त्या
हळुवार  क्षणांना  …!!
अलगद येऊन बिलगतात
माझिया मनाला   ....!!!

स्पर्शून जातो
वारा  …
अनं गंध तुझा येतो  … !
क्षणिक रिमझिमल्या
मनाला
रंगात न्हाऊन जातो   … !!

मग -
तुला भेटाया
मन काहुर काहुर  होतो
अनं -
क्षितिजावर पहाते
तुझा रंग बदलेला   …!!!

परि -
पाहुन रंग
तुझा तृप्त
मनी अतृप्त
मी न राहते
ठाऊक असे  मजला
आतला रंग , रंगातला   ....!!

                                    
                                     "समिधा"


                                     




शनिवार, १९ जुलै, २०१४

भेटायला मी घाबरते …!!!

 
















 

 

असं तर  मी  …

रोज  प्रत्येक क्षणी

प्रत्येकाला भेटते  ....!!

पण स्वत:लाच   ....

एकांतात भेटायला

मात्र कचरते  ....!!

त्या प्रत्येक

एकांति क्षणांमध्ये

तुझा उच्चार होतो   …

त्या आठवणींना

भेटायला मी  घाबरते  …!!!

                                              

 (समिधा)

सोमवार, १४ जुलै, २०१४

रात्र होते अनं .... !!


















रात्र होते अनं  ....
आपसूक गहिरी होते
तुझी सय   ....
गहिवरून जाते माझी सवय
कुशीत तुझ्या झोपण्याची    …!!

रात्र होते अनं   …
खिड़्कीतला चंद्र तो
चांदणे पसरतो    ....
तुझ्या माझ्या रिकाम्या बिछान्यावर   ....!!

रात्र होते अनं  ....
दाटते  छाती
पान्हा फुटतो हुंदक्यांना
अनं  … ओलीचिंब होते तुझ्या
चितेवरची  माझी
स्वप्नांची राख   ....!!!!

                                            "समिधा" 

शनिवार, २९ मार्च, २०१४

"" मृगजळ "" …?



काही आठवणी
किती हाकलाव्या तरी
फिरून येतात   ...........
आणि चिटकुन राहतात
गोचिडासारख्या   … आत्म्याला
आणि पीत रहातात जीवनरस   ....!!

आणि बाहेर   ....
समाज नावाचा ढेकुण
टोचत बोचत  शोषत रहातो
आणि पोसत  राहतो   … त्यांना
खेचत नेतात मला मृगजळात   .... !!!

मग   … जगणेच  होतो  फास   …
आणि आवळत  रहातो
आस्तित्वाचे  पाश   … !!!
हताश हतबल  मनाचे हात
खेचत रहातात  त्यांच्यापासून   .... !!

खोल खोल काळ्या डोहात
बुडवाव्या त्या आठवणी
तर त्या मलाच घेऊन
बुडतायत  मृगजळात  …!!
मीच मला अनोळखी होते
माझ्याच अंतरगाभा-यात   …!!

हळुहळु  मग
त्यांचेच होतात भास्
आसपास  …!
आणि मग कधी भासात
तर कधी सत्यात  जगत रहाते
भास् आभास सत्य यांच्यात
फिरत रहाते
निरंतर अविरत  ……
माझ्या निरथर्क
अस्तित्वाला  पहात   …!!!!



                         "समिधा "