आता बसले वेचित दारी
फुले प्राजक्ती गुंफित वेणी
सोबत सारी आठवांची
अर्धि कच्ची प्रेमकहाणी ....!
फूल फुलावे फांदीवरती
फांदीवर ते डुलत राहावे
कधी मधी यावे भुंग्याने
फूल फुलांतून उठून जावे ....!
मी माझ्यातून मुक्त होऊनी
कधी पाहिले तुझ्यात नाही
द्यावे घ्यावे मूक क्षणांना
तेंव्हा काही कळले नाही .....!
येता जाता नजर भिडता
हृदयी धड़धड़ किती बावरली
फुलपाखरी मिटुनी डोळे
हसुनि गाली वेळ दवडली ....!
आले क्षण ते गेले क्षण
पहाटवारे वहात राहिले
त्या स्मृतींचा धुंद गंध
ध्यानीमनी अजुनी ल्यायले ....!
आता बसले वेचित दारी
फुले प्राजक्ती गुंफित वेणी
सोबत सारी आठवांची
अर्धि कच्ची प्रेमकहाणी ....!
"समिधा"