सोमवार, १८ एप्रिल, २०१६

" शब्दांना माहीत आहे ......!!! "

girl and boy साठी प्रतिमा परिणाम

शब्दांना  माहीत आहे
तुझ्या माझ्या रुसण्यात
शब्दांना सुट्टी असते
फ़क्त एकांती गुणगुणने
किंवा सुरेल शिट्टी असते   ...!!

शब्दांना माहीत आहे
तू तशीच , तू तसाच
वादावादात जुंपलेलं
तरीसुद्धा ,
तुझे मन माझे मन
मनामनात गुंतलेलं   ..... !!

शब्दांना माहीत आहे
रुसणं म्हणजे
नुसतं झुरणं
भल्याबु-या आठवणींच्या
गुंत्यात गुंतणं   .....!!

शब्दांना माहीत आहे
रुसण्यात फ़क्त
मी तुला , तू मला
नजरेनं टाळतो
शब्द असतातच कुठे
तरीसुद्धा
तू माझे , मी तुझे मनामनात
अनेक अंदाज बांधतो   ....!!

शब्दांना माहीत आहे
आपल्या आतलं भांडण
तुझ्या माझ्या नजरेतलं
दाटलेलं  नभांगण
नभांगण बरसतांना
शब्द असतातच कुठे
तेव्हां फ़क्त तुझ्यामाझ्या
प्रेमाला मिठीचं कोंदण   .....!!

शब्दांना माहीत आहे
आपल्या आतलं भांडण   ....!!!


                                                 " समिधा "