गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

तू आजही तसाच मोकळा अनं मी ....??


 


तू
चांदणझूल्यावर
झुलतोस तिथे
अनं  मी
प्रखर उन्हाच्या मखरात  …!!

तू मेंदिभरल्या 
पावलांचे ऐकतोस गुंजन 
अनं  मी 
रोज फिरते घेऊन 
शिव्या शापांचे आंदन  … !!

तूझे  रुपड़े रुबाबदार
रोज पाहतो  आरशात
अनं  मी
बापड़ी होऊन
डोके खुपसते अंधारात   …!!

तू काठावर प्रेमाच्या
अलगद तरंगत फिरलास
अनं मी
अथांग डोही बुडले
स्वप्नांचा  घेऊन ध्यास   … !!

तू पाठ फिरवली
तेंव्हा निष्कलंक , निर्मोही
अनं मी
पापिनी ,लज्जाहीन
दुरवर्तनी , दुराग्रही  .... !!

तू आजही
तसाच मोकळा
अनं मी
कोंडलेली
आत्माही कोंडला  …!!


                                       "समिधा "