सोमवार, ७ मे, २०१८

जेव्हा ती घरभर........!

 संबंधित इमेज

जेव्हा ती घरभर वावरते दिवसभर

घराच्या भिंती घराचे छत आणि घराचे फ्लोअर...

यांचेच वेध घेऊन सजवत असते

गादी आणि उशांचे कव्हर ....!

घराला कितीही आवरलं सावरलं

तरी भरत नाही तिेचे मन ......

कोप-यातलं जळमट, भिंतींचा उडालेला रंग

मिटवत नाहीत घराचं घरपण....

तरी कावरी बावरी होते तिची नजर.....!

घराबाहेर असली तरी

डोळ्यात  भरून नेते घर .....

कुठे गैस लाईट पंखा चालू तर नाही गिझर...?

आतली नजर फिरून येते भरभर......

जेव्हा ती घरभर वावरते दिवसभर...!

घर तिच्या सोबत तिच्या आत असते.....!

कधी पाठीवर तर कधी मानगुटीवरही बसते.....

घराला घरपण देताना रोजच दमते भागते

तरी उंब-यातल्या रांगोळीत रंग भरून

स्वत :ला सिद्ध करीत असते..!

घराला लागते धाप जेव्हा ती थकते

घर चिडते, ओरडते जेव्हा ती चुकते

अनं एक दिवस ...

घर थांबते ....अस्ताव्यस्त होते...

घराचे घरपणही जाते.....

घर झुरते....

घर रडते.....

जेव्हा ती घरभर वावरत नसते दिवसभर.....!!!


@ समिधा
ओली हाक...... !


  

काल तुला पुन्हा हाक मारली

ऐकलीस नं....?

तुला किंचीत ह...ल...क...सा... स्पर्श झाला असेल

आत तरंग उठला असेल....

आणि माझी अलवार आठवण झाली असेल .....!

झाली नं...?

तू बोलत नसलास तरी

इथे  मला कळते....

तुझी हाक मी नेहमीच ऐकत असते ....

झोपण्यापुर्वी बंद डोळ्यात

तुझा रिकामा कॅनव्हास माझ्याच मनातल्या अनेक

मुर्त प्रतिमांनी भरून घेत

डोळे मिटून घेते ......

आणि सकाळी डोळ्यात साठलेेले

ह्रदयात उतरलेल्या तुझ्या अस्तित्वाला

सोबत घेऊन आजही जगते ......

तुझ्या हाकेतला ओलावा

अजुनही ओला आहे.....

कालची माझी हाक अशीच ओली होती

ऐकलीस नं....?


@ समिधा