तू जेव्हा बोलत नाहीस
माझे शब्द रूक्ष
कोरडे म्हातारीच्या
केसांसारखे भुरभूरत
राहतात अस्ताव्यस्त ...!
तू जेव्हा भेटत नाहीस...
माझे शब्द होतात
टणक दगड
पडून रहातात मनाच्या
तळाशी निपचीत..!
तू बोल नं
म्हणजे माझे शब्द होतील
पाण्याने गच्च भरलेल्या
काळ्या ढगांसारखे....
बरसतील...!
रिमझीमतील....
नितळ स्फटीक होऊन
पानाफुलांवर झुलतील
चमकतील....
जमीनीत रूजतील
जन्मतील नवे होऊन....!
तू भेट नं
म्हणजे माझे शब्द
सप्तरंगी फुलपाखरं होतील
उडतील
बागडतील
नाचतील
डोलतील....
हळूच माझ्या शब्दांत
सतरंगी रंग भरतील....!
तुला कळतंय का
तू बोलावास...
तू भेटावास....
म्हणून माझे शब्द
क्युटसं हसून तुझ्याकडे
पहातायत...
चांदण्यांनी चंद्राकडे
लाडाने पहावे तसे....!
समिधा