भरजरी नातं...!
इतकं कसं जीर्ण झालं
तुझं माझं नातं...?
कळलंच नाही ...
तलम मुलायम नात्याला
कसर केव्हा लागली ...?
उसवतय ते आपल्याही नकळत!
कित्ती कित्ती मिरवलय
हातात हात घालून
हे भरजरी नातं...!
आजकाल मात्र
भर मांडवात
हे कसर लागलेलं नातं
लपवतांना चेह-यावरचा ताण
स्पष्ट दिसतोय....
इतकी जीर्ण झालीय का
नात्याची वीण की,
समजुतदार धागेही
घट्ट बीलगत नाहीत
आता नात्याला...!!
प्रेम विश्वासाच्या डांबरगोळ्यांवर
नात्याला गृहीत धरून जपत आलो
आपणच एकमेकांच्या सप्तरंगी
अपेक्षांमध्ये नेहमीच घट्टमुट्ट
बांधत आलो ....!!
खरंतर मध्ये मध्ये नात्याला
ऊन दाखवायला हवे होते
एकमेकांच्या स्वच्छ भविष्याचे
आणि मोकळी हवा श्वासही
घेऊ द्यायला हवा होता
आपआपल्या स्वप्नांच्या बाल्कनींत ..!
मग पुन्हा पुन्हा लपेटलो असतो
एकमेकांच्या धाग्यात घट्टमुट्ट
एकाच तलम मुलायम भरजरी नात्यात ....!!
"समिधा "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा