शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

होऊ नकोस पुन्हा, ती द्रौपदी ती सीता ...!!


वेलिलाही वाटे आता

आईपणाची भीती

कळ्यांना  सांगे  नका

गंधाळु  फुलण्याआधी ...!!

 

की सांगावे कळ्यांना

उमलू नकाच केंव्हा ....

कळणार नाही तुम्हां 

कुस्करल्या जाल  केव्हा ...!!

 

मी रोज पहाते बाजारी

तुडवलेल्या कळ्यांना 

अनं निर्माल्य झालेल्या

घरातल्या फुलांना ....!!

 

देव्हारी पुजली कधी 

सरणांवर उधळली

योनी भोगांचेही भोग

त्यांच्या थोपलेले भाळी..!!

 

यावे कुणीही आणि

त्यांना चुरगाळून जावे

छिन्नविछीन्न पाकळ्यांना

इथस्थता  फेकावे ...!!

 

हे संपणार कधी

कळ्यांचे कुस्करणे

उमलावे की नाही  

की गर्भातच मिटणे ...!!

 

तरीही वेल सांगे 

गर्भातल्या कळिला

तू उमल गंधाळून

स्मरून तव सृजनाला  ...!! 

 

तू जननी  तू साधवी 

तू लखलखती सौदामिनी

या केवळ उपमांनी 

नको भाळूस  तू रमणी  ....!!

 

तू फुलवावे अंगार

तूझी गाजावी गाथा 

होऊ नकोस पुन्हा 

ती द्रौपदी ती सीता  ...!!

 

                                   " समिधा "

 























  





३ टिप्पण्या :