गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

" भावओले तुझे डोळे ...... "

 
भावओले तुझे डोळे
ह्रदयात उतरले....
कळलेच नाही
कधी हाती हात तुझे  आले....!

शब्दांची अडखळली पाऊलवाट
भावनांचे चंद्रचांदणे  पसरले
कळलेच नाही
कधी ईथवर आली नि:शब्द पाऊले....!

ह्रदयी धडधड अबोल गाणी
कितीक विरह अव्यक्तात जपले
कळलेच नाही
कधी तुझे मन माझ्या मनी उतरले...!

प्रित गातसे विरह विराणी
ह्रदयी स्मृतींचे वसंत जपले
कळलेच नाही
कधी दारी गुलमोहर बहरले.....!!!


                                                 " समिधा "

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

कधी केंव्हा नकळे ....! कवीवर्य मंगेश पाडगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली !





कधी  केंव्हा नकळे
तुझ्या माझ्या  ....
जुळल्या होत्या तारा   ...!
प्रेमासाठी भुकेल्या आम्हा
देत होतास चारा   ....!
प्रेम म्हणजे प्रेम असते
तूच  शिकवलास धड़ा
तुमचे आमचे सेम असते
तोच गिरवला पाढा  ....!
प्रेमळाचा तू प्रेमदूत
कालिदास तू
मेघदूत  ...!
या जगण्यावर या जन्मावर
शतदा प्रेम करावे  ....
जन्म सार्थकी करण्याचा
मार्ग दाखविला थोरां   ... !
तो उत्साह   ... ती अभिव्यक्ति
स्रोत शोधावा कुठे   ...
तुमच्या ठायी  ... अवती भवती
तिथेच विरली धारा   ....!!
कधी  केंव्हा नकळे
तुझ्या माझ्या  ....
जुळल्या होत्या तारा   ...!
 


                                    " समिधा "





                                                








सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

अर्धि कच्ची प्रेमकहाणी ....!

 

आता बसले वेचित दारी
फुले प्राजक्ती गुंफित वेणी
सोबत सारी आठवांची
अर्धि कच्ची प्रेमकहाणी   ....!


फूल फुलावे फांदीवरती
फांदीवर ते डुलत राहावे
कधी मधी यावे भुंग्याने
फूल फुलांतून उठून जावे  ....!


मी माझ्यातून मुक्त होऊनी
कधी पाहिले तुझ्यात नाही
द्यावे घ्यावे मूक क्षणांना
तेंव्हा काही कळले नाही   .....!


येता जाता नजर भिडता
हृदयी धड़धड़ किती बावरली
फुलपाखरी मिटुनी डोळे
हसुनि गाली वेळ दवडली  ....!


आले  क्षण  ते गेले क्षण  
पहाटवारे वहात राहिले
त्या स्मृतींचा धुंद गंध
ध्यानीमनी  अजुनी ल्यायले ....!


आता बसले वेचित दारी
फुले प्राजक्ती गुंफित वेणी
सोबत सारी आठवांची
अर्धि कच्ची प्रेमकहाणी   ....!


                                                 "समिधा"
















बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

" मी माळले श्वासात तुला ....!"

 


















मी माळले श्वासात तुला   ....!
अनं   ---
तू असशी इथे तिथे
हे भासही गळाले   ....!!

मी प्राशीले गंधात तुला    ....!
अनं   ---
तू  माझ्याहुन वेगळा
हे भानही नाही उरले   .... !!

मी दिन राती गणल्या
तुझ्याच भेटींना   ....!
अनं  --- 
तू नजरेआड होता
दिन माझे मावळले   ....!!

मी पहाते अवती भवती
तुझ्याच खुणांना   .... !
अनं  ---
तू तसाच पाही मजला
मज अंतरंगी कळले   ….!!

तू  वाट धुक्याची आहे  …
मी भास आभासांची   ....!
अनं   …
हे सर्व जाणिले तरी   ....
प्रेमात रमलो खुळे    …!!!


                                         " समिधा "









शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

प्रत्येकाला फुलपाखरांचे पंख आहेत ……!!"


 "जीवन म्हणजे काय केवळ
  काटेरी डंख आहेत ….?
  डोळे उघडून पहा तरी
  प्रत्येकाला फुलपाखरांचे पंख आहेत ……!!"

                                                        "  समिधा "

तू बरोबर असलीस की ....




 तू बरोबर असलीस की
रानं … फुले हसतात
तुझ्याशिवाय दिसलो की
सारे माझ्यावर रुसतात …!!

                                       " समिधा "

बोलता बोलता .....




 बोलता बोलता
 नि:शब्द झालीस 
अनं ... एका क्षणात मला 
एकटं पाडून गेलीस ……!!

                                      " समिधा "