
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
गुरुवार, २८ एप्रिल, २०१६
सोमवार, १८ एप्रिल, २०१६
" शब्दांना माहीत आहे ......!!! "
शब्दांना माहीत आहे
तुझ्या माझ्या रुसण्यात
शब्दांना सुट्टी असते
फ़क्त एकांती गुणगुणने
किंवा सुरेल शिट्टी असते ...!!
शब्दांना माहीत आहे
तू तशीच , तू तसाच
वादावादात जुंपलेलं
तरीसुद्धा ,
तुझे मन माझे मन
मनामनात गुंतलेलं ..... !!
शब्दांना माहीत आहे
रुसणं म्हणजे
नुसतं झुरणं
भल्याबु-या आठवणींच्या
गुंत्यात गुंतणं .....!!
शब्दांना माहीत आहे
रुसण्यात फ़क्त
मी तुला , तू मला
नजरेनं टाळतो
शब्द असतातच कुठे
तरीसुद्धा
तू माझे , मी तुझे मनामनात
अनेक अंदाज बांधतो ....!!
शब्दांना माहीत आहे
आपल्या आतलं भांडण
तुझ्या माझ्या नजरेतलं
दाटलेलं नभांगण
नभांगण बरसतांना
शब्द असतातच कुठे
तेव्हां फ़क्त तुझ्यामाझ्या
प्रेमाला मिठीचं कोंदण .....!!
शब्दांना माहीत आहे
आपल्या आतलं भांडण ....!!!
" समिधा "
गुरुवार, ७ एप्रिल, २०१६
सोमवार, ४ एप्रिल, २०१६
अगदी निरंतर......
अगदी निरंतर नव्या नवलाईने
जपते प्रेमाला ....
दिवसाला सुरुवात करताना
एक हलकिशी झुळूक यावी
तशी त्याची आठवण येते ....
मनाला सुखद थंडावा देते .....
गुणगुणतच सारा दिवस मग निघून जातो ,
हलकेच .... अलगद मला संध्येच्या
कवेत आणून सोडतो .....!!
" समिधा "
सोमवार, १४ मार्च, २०१६
राधेची मनबाधा .....!!
तू तुझ्या उंबर-याशी घट्ट
पकडून, जखडून होतीस ....
तरी तू सुरेल बासरीच्या
सुरांमागे धावत गेलीस .....!
त्या घननिळ्या प्रकाशांत
भावभक्तीने बुडतांना ....
मागे किती झाला असेल
अंध:कार , हाहाकार .... !
परतीचा उंबराही जळून गेला असेल ....!
तरीही तू ओलांडलेले ठसे
काळवंडले नाहीत ...!!
" समिधा "
बुधवार, ९ मार्च, २०१६
दीपकळीला जपायची आहे ....!
का तुझ्या माझ्यातल्या
या अदृश्य स्पंदनांना
मी विस्कटू देत नाही ....?
तलम मृदु स्पंदने
जपतानाची माझी धडपड
तुला दिसत नसेल पण
रात्रीच्या गडद अंधारात
चमकणारा ठिपका
माझ्या डोळ्यांतले अश्रु
असतात हे तुला तुझे
डोळे मिटतांना दिसत
असतील ...!
तेच तर मला हवे ...
श्वासांची धड़धड़
होते आहे तोपर्यंत
तुझ्या माझ्यातल्या या
अदृश्य स्पंदनांच्या
तेवत्या दीपकळीला
जपायची आहे ....!
"समिधा"
शनिवार, ५ मार्च, २०१६
इतक्या वर्षांनंतर शेवटी ....!!
इतक्या वर्षांनंतर शेवटी
एकदा आपण भेटलो
त्या एका भेटीत
किती मागील - किती पुढील
कित्ती कित्ती बोललो .....!
तुझी माझी आई कशी , बाबा कसे
आणि इतर सगळे ठीक का ...?
आणि इतर मध्ये सगळे वगळून
कित्ती कित्ती बोललो ....!!
तुझ्या माझ्या शब्दांमध्ये
पत्त्यांचा डाव होता
एक शब्द तुझा
आणि एक शब्द माझा होता
शब्दांमध्ये हरलो नाही
दोघेही आपण
हरले होते शब्द मात्र
तेंव्हा आपण थांबलो .....!!!
बोलता बोलता डोळ्यांमध्ये
बरेच काही वाचले.
तुझे माझे आकाश तिथे
चांदण्यांनी व्यापले...
तरीसुद्धा एका कोप-यात
अश्रुंना रोखले....
अश्रुंना रोखतांना
पुन्हा पुन्हा हसलो .....
इतक्या वर्षांनंतर शेवटी
पुन्हा एकदा हरलो ....!!!!
पुन्हा एकदा हरलो ....!!!!
"समिधा"
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)