गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०१५

"गुंत्यात सा-या गुंतवूनी ....."




गुंत्यात  सा-या गुंतवूनी
सहज त्याचे सांगणे ……!
गुंतू नकोस  माझ्यात
बरे नव्हे गुंतणे  ....... !!

खरंच  ....
इतके सहज असते
रेशमी मखमली धागे
उसवणे  ……??

खोल श्वास घेऊनी
देई अबोल हुंदका
खरंच   ……
किती कठिण ते
अश्रुंना दटावणे  ……!!

पाठ तुझी फिरता
झाली फितूर दुनिया
माझ्याही श्वासांना
जड झाले झेलणे ……!!!

येशील तू परतही
माझी खुशाली पुसण्या
काय सांगावे कसे
असेल आपले भेटणे  .... !!!

तू तुझा अनं मी माझी
नाते असेल संपले
की जुन्या स्पंदनांना
जागवावे नव्याने   ……???


                                                    "समिधा"














बुधवार, २३ सप्टेंबर, २०१५

काही तुला सांगावे .... !







काही तुला सांगावे  .... !
काही तुझे ऐकावे   …!
पुरे झाले एकमेकां पहाणे    
मौनात गेले कितीक  दिसराती 
शब्दांचे झूले मनातच झूलती   …!
कधीतरी स्फुरावे अंतरंगी स्वरांना 
तुझ्या माझ्यातले मौनातले गाणे   ....!
असा सडा शब्दांचा पडावा
मोहरून जावीत झाडफुलपाने
अनं …तशातच माझे लाजुन हसणे  …!!!


                                                     
                                                                                         " समिधा "

गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५

अस्वस्थ मनाच्या तळ|शी ....!!























अस्वस्थ मनाच्या तळ|शी
एक अपमान   … की अहंकार
दडपून ,
हसण्याचा माझा केविलवाणा
प्रयत्न   …!
दगडाने मला ठेचले असते
तरी चालले असते   …
पण पाठ वळवून तू
निघून गेल्यावर   …
हसण्याचा तुझा उद्दामपणा   …!
माझ्यावरचा तो घाव
तू परत आल्यावरही
भळभळुन वाहतोय   …
निपचीत  पडलय प्रेम
निरवंश झालेल्या
प्रेतासारखे   …!!!


                                          " समिधा "


सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५

प्राजक्ताचे सडे......!

 
 
 
मी सोडून दिले कधिचेच
वाट पहाणे  ....
कधी, केव्हा पडतील अंगणी 
प्राजक्ताचे सडे......!
तू मनातच बरसत रहा
मी झेलीत राहीन तुझे अविरत …
आठवणींचे सडे .....!

       
                                  " समिधा "

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

काश मला तू .....!!

 


काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला  अडवतांना रडला नसतास   …!
सहज तुला विसरले असते कदाचित   !
घाव घालून भरलेल्या जखमांना पुन्हा
नुसते पाहिले तरी आठवतात वेदना   …
पण तुझे तसे नव्हते     ....!!
वेदनांचाच तू नेमका धरून हात
आयुष्यात केला होतास शिरकाव   …
वेदनांचा फायदा तुलाच नेमका
कसा उमगला   …?
काश मला तो उमगला असता  ....!
तर -
तुझे आयुष्यात येणे रोखले असते कदाचीत    …!
माझ्या वेदनांना तटबंदीत कोंडले असते
मग सहनुभूतींना धुमारे फुटलेच नसते   …
काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला  अडवतांना रडला नसतास   …!
तुला विसरायला झगडले नसते  , पण
आठवतांना तू आता कवितेतून येतोस  …
आणि मग कविता होउनच सोबत राहतोस   …
काश कवितांना श्वासात भिनवले नसते   … !

काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला  अडवतांना रडला नसतास   …!


                                                 " समिधा "







बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

निःशब्द शब्द होते …!!


girl and boy साठी प्रतिमा परिणाम

हातात हात घालून चालतांना
वाटलेच नाही
सुटतील कधी   !
एक एक स्वप्न जोडतांना
वाटलेच  नाही
तुटतील कधी   !

फार लांबवर
चाललोच नाही
स्वप्न घेऊन उराशी
असे कसे हरलो आपण
नियतीशी लढलोच नाही   !

हात  होते सुटलेले
स्वप्न होते तुटलेले
डोळा तुझ्या होते पाणी
मी मात्र स्तब्ध होते
तुझ्या माझ्यात फक्त
आता निःशब्द शब्द होते
निःशब्द शब्द होते     …!!

                                    " समिधा "