माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
गुरुवार, ७ एप्रिल, २०१६
सोमवार, ४ एप्रिल, २०१६
अगदी निरंतर......
अगदी निरंतर नव्या नवलाईने
जपते प्रेमाला ....
दिवसाला सुरुवात करताना
एक हलकिशी झुळूक यावी
तशी त्याची आठवण येते ....
मनाला सुखद थंडावा देते .....
गुणगुणतच सारा दिवस मग निघून जातो ,
हलकेच .... अलगद मला संध्येच्या
कवेत आणून सोडतो .....!!
" समिधा "
सोमवार, १४ मार्च, २०१६
राधेची मनबाधा .....!!
तू तुझ्या उंबर-याशी घट्ट
पकडून, जखडून होतीस ....
तरी तू सुरेल बासरीच्या
सुरांमागे धावत गेलीस .....!
त्या घननिळ्या प्रकाशांत
भावभक्तीने बुडतांना ....
मागे किती झाला असेल
अंध:कार , हाहाकार .... !
परतीचा उंबराही जळून गेला असेल ....!
तरीही तू ओलांडलेले ठसे
काळवंडले नाहीत ...!!
" समिधा "
बुधवार, ९ मार्च, २०१६
दीपकळीला जपायची आहे ....!
का तुझ्या माझ्यातल्या
या अदृश्य स्पंदनांना
मी विस्कटू देत नाही ....?
तलम मृदु स्पंदने
जपतानाची माझी धडपड
तुला दिसत नसेल पण
रात्रीच्या गडद अंधारात
चमकणारा ठिपका
माझ्या डोळ्यांतले अश्रु
असतात हे तुला तुझे
डोळे मिटतांना दिसत
असतील ...!
तेच तर मला हवे ...
श्वासांची धड़धड़
होते आहे तोपर्यंत
तुझ्या माझ्यातल्या या
अदृश्य स्पंदनांच्या
तेवत्या दीपकळीला
जपायची आहे ....!
"समिधा"
शनिवार, ५ मार्च, २०१६
इतक्या वर्षांनंतर शेवटी ....!!
इतक्या वर्षांनंतर शेवटी
एकदा आपण भेटलो
त्या एका भेटीत
किती मागील - किती पुढील
कित्ती कित्ती बोललो .....!
तुझी माझी आई कशी , बाबा कसे
आणि इतर सगळे ठीक का ...?
आणि इतर मध्ये सगळे वगळून
कित्ती कित्ती बोललो ....!!
तुझ्या माझ्या शब्दांमध्ये
पत्त्यांचा डाव होता
एक शब्द तुझा
आणि एक शब्द माझा होता
शब्दांमध्ये हरलो नाही
दोघेही आपण
हरले होते शब्द मात्र
तेंव्हा आपण थांबलो .....!!!
बोलता बोलता डोळ्यांमध्ये
बरेच काही वाचले.
तुझे माझे आकाश तिथे
चांदण्यांनी व्यापले...
तरीसुद्धा एका कोप-यात
अश्रुंना रोखले....
अश्रुंना रोखतांना
पुन्हा पुन्हा हसलो .....
इतक्या वर्षांनंतर शेवटी
पुन्हा एकदा हरलो ....!!!!
पुन्हा एकदा हरलो ....!!!!
"समिधा"
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६
" दे जरा हात तू नव्या पालवीचा ...."
मी तुला अनं तू मला
का ओळखीचे होऊन पहावे ....?
खुप झाले खरे खोटे बहाणे
का आता जुन्या स्मृतीना स्मरावे ..?
दे जरा हात तू नव्या पालवीचा ....
मीही फूलून येईन नव्याने .... !
का आता जुन्या मुळाशी व्यर्थ खेळावे ....?
देहात तुझ्या नव्या स्पंदनांना वाहु दे
मलाही जमेल आता भावंनांना समजावणे
का वृथा घालमेल ही जीवांची , सारे सावरावे ..
मी तुला अनं तू मला
पुन्हा नव्याने भेटावे ....!!!
पुन्हा नव्याने भेटावे .... !!!
" समिधा "
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६
" दारातला मोगरा गळून जातो..... !"
कित्येक दिवसांत
तुझ्या येण्याची चाहूल लागली नाही ....
अचानक .... दारातला मोगरा फुलला की आपसूक
सुगंधि सकाळ चलबिचल होते ...!
प्राजक्ताचा सडा दारात रांगोळी घालतो ...
आणि मला वेडीला गोंधळात टाकतो .....!
ती वेळ तू येण्याची नसते नं ....!!
आणि तरी माझी लगबग,
साज चढवायची ... हातात चुडा भरून
कपाळभर कुंकु गोंदवायची ....!
डोळ्यात चमकणारी रात्र लपवायची ...!!
घरभर भिरभीर फिरून संसार सजवायची ...!!
साग्रसंगीत सुगरन विडा सजवून
वाट पहायची ....!!!
दारातला मोगरा गळून जातो ....
प्राजक्ती सडा सुकून जातो ...
सारा साज उतरतो ....
सुग्रास संसार सारा बाजूला पडतो ....
जेंव्हा दारात तुझ्याशिवाय फ़क्त ....
राष्ट्रभक्तीचा ध्वज फडकतो ....!!
*** देशासाठी बलिदान करणा-या
वीर जवानांच्या अर्धांगिनी वीरांगणींना समर्पित ...!
"समिधा"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या
(
Atom
)
