बुधवार, ५ एप्रिल, २०१७

स्वप्नांनो......!

     

उराशी जपलेल्या

स्वप्नांना मी गंजू देत नाही

घासून पुसून पितळी भांडी लख्ख करून ठेवावी

तशीआऊटडेटेड होण्या आधी!

स्वप्नेही अपडेट करीत असते

लवचीक होण्यासाठी

स्वप्नांना रोज लहान मोठं होण्याची

एक्सरसाईजही देते

परिस्थितीला जुळवून घ्यायची

तेवढीच सवय होते

स्वप्नांना जगण्यात उतरंवायचं

तर पेशन्स वाढायला

रोज देवळात जाते

नोटबंदीच्या काळात स्वप्न घेऊनच

तर उन्हातान्हात उभी होते

स्वप्नांनाही सत्तांतर , अर्थसंकल्पाचा

बसतो फटका

मग स्वप्न कधी लांबणीवर तर

कधी बरखास्त करते

धार्मीक दांभिकता मानत नाहीत माझी स्वप्न

सत्यात येण्यासाठी कधी

गणपतीला अगरबत्ती

दर्ग्यावर चादर ,

येशूला मेणबत्तीही पेटवते

भरकटतील अशी परिस्थिती सध्या आहे खरी

म्हणून स्वप्नांना एकटे सोडत नाही कधी

मोठी खोटी स्वप्न विकणारे खुप आलेत बाजारात

माझ्या स्वप्नांना उगीच

लहान लहान म्हणून चिडवतात

तरी स्वप्न पहायची बंद नाही केलीत

तीच तर जगवतात

नाहितर कधीच संपले असते

आणि डोळ्यात आजकाल मी

काजळ नसते घालत

डोळ्यांत फक्त आणि फक्त

स्वप्नच सजवते .....

उगीच नाही माझ्या डोळ्यात

एक वेगळीच चमक दिसते !!



                                           © "समिधा"

                                                                      

२ टिप्पण्या :