मंगळवार, १७ मार्च, २०१५

" तो असाच अवचीत .... !"


 

तो असाच अवचीत भेटला 
गाभुळल्या नजरेला दिसला   .... !!
इवल्या इवल्या भेटींनी 
मनात व्यापून  बसला   .... !!
तो असाच अवचीत भेटला . 

चिमटीमधुनि फुलपाखरु 
अलगद निसटावा 
तो असाच अवचीत विरला  . 
पण मागे उरला 
रंग मुलायम हृदयी रुतलेला   !!
तो असाच अवचीत विरला  .


                                             "समिधा "

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

तू आजही तसाच मोकळा अनं मी ....??


 


तू
चांदणझूल्यावर
झुलतोस तिथे
अनं  मी
प्रखर उन्हाच्या मखरात  …!!

तू मेंदिभरल्या 
पावलांचे ऐकतोस गुंजन 
अनं  मी 
रोज फिरते घेऊन 
शिव्या शापांचे आंदन  … !!

तूझे  रुपड़े रुबाबदार
रोज पाहतो  आरशात
अनं  मी
बापड़ी होऊन
डोके खुपसते अंधारात   …!!

तू काठावर प्रेमाच्या
अलगद तरंगत फिरलास
अनं मी
अथांग डोही बुडले
स्वप्नांचा  घेऊन ध्यास   … !!

तू पाठ फिरवली
तेंव्हा निष्कलंक , निर्मोही
अनं मी
पापिनी ,लज्जाहीन
दुरवर्तनी , दुराग्रही  .... !!

तू आजही
तसाच मोकळा
अनं मी
कोंडलेली
आत्माही कोंडला  …!!


                                       "समिधा "



मंगळवार, २० जानेवारी, २०१५

तू सोबत असलास की ..... !!

 

तू  सोबत  असलास की ,
उन्हाचेही चांदणे होते   …!!
तू खळखळून हसलास की ,
समुद्रालाही भरती येते    …!!
तू नुसता बघत असलास की ,
मौनालाही काव्य सुचते   …!!

                           
                         " समिधा "


बुधवार, १० डिसेंबर, २०१४

आज कित्ती कित्ती दिवसांनी ....!!



 


आज कित्ती कित्ती दिवसांनी भेटतोस   ....!!
आणि  असा काय  पाहतोस   …?
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का केलंस  …??

हं   …
मोग-याला ओंजळीत घेऊन चुंबताना
धुँवाधार पावसाला मिठीत घेऊन  भिजतांना
चंद्राकड़े एकटक पाहुन   …
हळूच त्याला फ्लाइंग किस  देतांना  ....
तू मला पाहिलं तर नाहीस   ....?
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का
केलंस   ....??

 हं  …
कित्ती कित्ती तुला मी सर्च केलं
पण ... कुठे नाही भेटलास  ....
मग तू कधी मोग-यांच्या पाकळ्यांत
पावसाच्या मिठीत गवसलास
तर कधी चंद्राच्या कुशीत दिसलास   … !!

हं  ....
इतका रे कसा तू जेलस   …!
इतकंच का मला तू ओळखलंस   ....?
म्हणूनच का मला  टाळलंस  …
म्हणूनच  आले तुझ्या स्वप्नात   ....!!
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का केलंस   ....??

                                 "  समिधा  "

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

तरिही ... बाकी … काही …!!!




















स्वप्नात  .... तुझ्याशी
हसले  ……  जराशी
तरिही  ….... उराशी
उरले   …… काही   …!!!

उन्मळून …. पडल्या
वेदना  …....  सा-या
तरिही   ..... . मुळाशी
बाकी   …....  काही   …!!!


                                       " समिधा "

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

सांग कसे विसरायचे त्या हळुवार क्षणांना …!!





















सांग कसे
विसरायचे त्या
हळुवार  क्षणांना  …!!
अलगद येऊन बिलगतात
माझिया मनाला   ....!!!

स्पर्शून जातो
वारा  …
अनं गंध तुझा येतो  … !
क्षणिक रिमझिमल्या
मनाला
रंगात न्हाऊन जातो   … !!

मग -
तुला भेटाया
मन काहुर काहुर  होतो
अनं -
क्षितिजावर पहाते
तुझा रंग बदलेला   …!!!

परि -
पाहुन रंग
तुझा तृप्त
मनी अतृप्त
मी न राहते
ठाऊक असे  मजला
आतला रंग , रंगातला   ....!!

                                    
                                     "समिधा"


                                     




शनिवार, १९ जुलै, २०१४

भेटायला मी घाबरते …!!!

 
















 

 

असं तर  मी  …

रोज  प्रत्येक क्षणी

प्रत्येकाला भेटते  ....!!

पण स्वत:लाच   ....

एकांतात भेटायला

मात्र कचरते  ....!!

त्या प्रत्येक

एकांति क्षणांमध्ये

तुझा उच्चार होतो   …

त्या आठवणींना

भेटायला मी  घाबरते  …!!!

                                              

 (समिधा)