
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
मंगळवार, १० जानेवारी, २०१७
हया अंतरीच्या गाठी.......

कधी येशील सख्या
गंधाळली रात दारी
चंद्र तेवतोय मंद
सरू नकोस सख्या
किती सरली युगे
तुझीच शब्दवेडी...
प्रिय.....
तुझ्या इनबॉक्सच्या गेटवर
माझे काही शब्द ताटकळत उभे आहेत...!
आणि तुलाही हे ठाऊक आहे...
तू उघडशील दार
तर ते भसकन आत येतील
आणि मग पुन्हा वेदनांचा कल्लोळ माजेल .....!!!
हे ही तुला ठाऊक आहे....
पण इतकी वर्ष मनाचे दार
सताड उघडे ठवून एकही
वेदना बाहेर गेली नाही नां.....
मग माझ्या शब्दांना असा का
टाळतोस.....
वेदना शब्द बनून भळभळून
वाहून जाऊ दे ना....
बघ मग तुझा इनबॉक्स
गच्च भरून वाहायला लागेल
साराच साठलेला गाळ
निघून जाईल आणि तळाला उरेल
फक्त आपले पारदर्शी नितळ स्वच्छ मन ....!
तुझीच शब्दवेडी...
© "समिधा"
गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६
"सप्रेम नमस्कार..."

सप्रेम नमस्कार...
पुढे पत्र कोरे
को-यात सारे
अश्रूंचे पसारे...
कोप-यात पहा
थोडे तिरके
माझे नांव तिथे
उजाड पोरके..
.
लिहावे कसे सांग
फक्त तूझीच ....!"
तरी थोडा मोकळा
ठेवला समास
हवे तसे पुढ्यात...
लिही काहीबाही
दे तेच उत्तर
बाकी काही नाही...!!
...........समिधा
© "समिधा"
"
बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६
सिगारेट .....
ओठांवर सिगारेट
ठेवावी ......
तेवढ्याच बेफिकीरीने ...
माझ्या ओठांवर
तुझे ओठ ठेवतोस .
सिगारेटची राख होताच
तिला टीचकीसरशी
झटकावे .....
अनं ......
गुंतलेल्या श्वासांना
धुराच्या लाटांवर
सोडून द्यावे .....
अगदी तेवढ्याच अलिप्ततेने
दूर लोटून देतोस .....!!
किती सहज सिगारेट
तुझ्या ओठांवर जळत असते ....!!
अनं मी ..?
आत अंतस्थी विझत असते ....!!
"समिधा "
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६
वंचना ......!
काही श्वास उसाशात निघून जातात...
तुझ्यामाझ्या नात्यात उगीच
व्यर्थ अर्थ ठेवून जातात...!
जीव धपापतो जेव्हा तू दूर असतोस
निनावी वेदनेला कुरवाळत
मग अख्खे दिवस निघून जातात.....!
वाया जाण्यासाठीच असतात
कदाचीत काही श्वास....
तरून नेतात प्राण क्षणभर
वंचनेचा देऊन भास...!
नजर मेल्यावर पहाण्याला
तसा काही अर्थ नसतो...
समोर तू असलास तरी
तुझी नजर माझ्यावर
भार असतो...!!
" समिधा "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)


