बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

कुठले शब्द झेलावेत तुझे...?



 


किती आणि कुठले शब्द
झेलावेत तुझे...?
कोमल हळव्या शब्दांना...
फुलांसारखे जपते निरंतर
पण पेटते निखारे शब्द तुझे
विझवावेत कुठवर...??

तू फेकतो निर्दयतेने
माझ्यावर शब्द,
दगड फेकावेत तसे...
अनं मी झेलते कधी चुकवते...
एखादा बसतोच जीव्हारी..
मग वेदनांचा फुटतो टाहो
आत आत फाटत जातो
मनातला रेशीमपदर....!!

तुला कधीच कळणार नाही का..?
शब्दांनाही असते धार..
चिरतात ते आतला स्निग्धगर्भ
जिथून जन्म घेते..वाढत असते
नाते...!
जे कधीच नसते संपणार....!!

तू आधीच खुडून टाकतोस
कोवळी संवादाची वेल
आणि चर्चा करतोस
मोठ्या वडपारंब्यांच्या
वंशावर....!!

शब्दांचे हळवे स्वर
कधीतरी ऐक ना...
तुझ्यामागे भिरभरणा-या
कोमल फुलपाखराला
एकदातरी जप ना...
तुझ्या दाटगडद शब्दांनी
उडतो त्याच्या पंखांवरचा रंग
आणि मग निस्तेज फिक्कट
फिरत रहातं ते घरभर...!!

कधी विसरू नकोस
शब्दांना वेठीला धरून
तू मारलेला वाग्बाण
परत घेता येत नाही....
नाजूक शब्दांना गळ घालून
भरून काढ झालेले घाव...
शब्दांचं काय ....
त्यांना मी झेलावेत,टाळावेत
कधी विसरावेत
तुझ्यावरील प्रेमाखातर...!!!!

                              

                          ©.  "समिधा "


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा