सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५

प्राजक्ताचे सडे......!

 
 
 
मी सोडून दिले कधिचेच
वाट पहाणे  ....
कधी, केव्हा पडतील अंगणी 
प्राजक्ताचे सडे......!
तू मनातच बरसत रहा
मी झेलीत राहीन तुझे अविरत …
आठवणींचे सडे .....!

       
                                  " समिधा "

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

काश मला तू .....!!

 


काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला  अडवतांना रडला नसतास   …!
सहज तुला विसरले असते कदाचित   !
घाव घालून भरलेल्या जखमांना पुन्हा
नुसते पाहिले तरी आठवतात वेदना   …
पण तुझे तसे नव्हते     ....!!
वेदनांचाच तू नेमका धरून हात
आयुष्यात केला होतास शिरकाव   …
वेदनांचा फायदा तुलाच नेमका
कसा उमगला   …?
काश मला तो उमगला असता  ....!
तर -
तुझे आयुष्यात येणे रोखले असते कदाचीत    …!
माझ्या वेदनांना तटबंदीत कोंडले असते
मग सहनुभूतींना धुमारे फुटलेच नसते   …
काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला  अडवतांना रडला नसतास   …!
तुला विसरायला झगडले नसते  , पण
आठवतांना तू आता कवितेतून येतोस  …
आणि मग कविता होउनच सोबत राहतोस   …
काश कवितांना श्वासात भिनवले नसते   … !

काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला  अडवतांना रडला नसतास   …!


                                                 " समिधा "







बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

निःशब्द शब्द होते …!!


girl and boy साठी प्रतिमा परिणाम

हातात हात घालून चालतांना
वाटलेच नाही
सुटतील कधी   !
एक एक स्वप्न जोडतांना
वाटलेच  नाही
तुटतील कधी   !

फार लांबवर
चाललोच नाही
स्वप्न घेऊन उराशी
असे कसे हरलो आपण
नियतीशी लढलोच नाही   !

हात  होते सुटलेले
स्वप्न होते तुटलेले
डोळा तुझ्या होते पाणी
मी मात्र स्तब्ध होते
तुझ्या माझ्यात फक्त
आता निःशब्द शब्द होते
निःशब्द शब्द होते     …!!

                                    " समिधा "



सोमवार, १० ऑगस्ट, २०१५

काय फरक पडतो ....!



काय फरक पडतो  ...
तू तिथे   ....
अनं मी इथे  …

तुझ्या वेदनेचा भास,
मला इथे होतो
अनं -
माझ्या आठवांचा
स्पर्श तुला तिथे होतो   …!

काय फरक पडतो   ....
तू तिथे   …
अनं मी इथे   …

तुझ्या श्वासांची ऊब
मला इथे जगवते
अनं -
माझ्या आसवांची
गाज़ तुला तिथे कळते  …!!

काय फरक पडतो   ....
तू तिथे   …
अनं मी इथे

तू अव्यक्तातही
खुप काही बोलतो
अनं -
माझ्या कवितांच्या
गाभ्यातून अविरत फुलतो   …!!!


                                                "  समिधा "

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

"त्या फितूर वेळा ......!"





अश्या फितूर वेळा आल्या पुरते बुडालो असतो
सावरले नसते स्वतःला नजरेतून उतरलो असतो   …!!

भेट क्षणाचीच  होती  पण परत भेटलोच नसतो
प्रेमाचा उच्चारही  निघता पुरते बिथरलो असतो  .... !!

तू , मी अनं  वेगळ्या वाटा दूर राहूनही भंगलो असतो
सावरलो  म्हणून आजही हृदयाचा हृदयी संवाद असतो   …!!

मी तुला अनं तू मला आज दुवा देत राहिलो नसतो
कळलेच नसते जर कधी प्रेमाला वासनेचा शाप असतो   …!!!


                                                                         " समिधा "





 

बुधवार, १५ जुलै, २०१५

"ती सोडून गेली तेंव्हा .... !"







 माझ्यात तिला उतरवण्याचा अट्टाहास फिजूल होता
 तिला तिच्या सावलितही  माझा चेहरा कबूल नव्हता  ॥ १ ॥

 पाहिले तिच्या नजरेच्या पल्याड एक आकाश होता
 मी कुठेच आस पासही नव्हतो असलोच तर एक पाश होता || २ ॥ 

 ती खोल डोहाचा एक अथांग अविरत स्रोत होता
 माझा काठावरचा निश्च्छल  ताठ  काटेरी पहारा होता   ॥ ३ ॥

 ती सोडून गेली तेंव्हा प्रश्न पडलेच नाहीत तिला
 माझ्याभोवती तेंव्हा   प्रश्नसंशयाचा फास होता        ॥ ४ ॥


                                                   " समिधा  "




शनिवार, ३० मे, २०१५

" तुला काय माहीत …"


 a alone indian woman  paintings साठी प्रतिमा परिणाम


तुला काय माहीत   …
जेंव्हा आपल्यात सर्व निरर्थक आहे
असं घडत होतं   … तेंव्हाच
नेमकं तुझ्या अस्तित्वाचा
अर्थ माझ्यात भिनत होता   …!
सर्व कागद कित्येकदा फाडलेत मी
ज्यावर तुझे नावं लिहीले होते   .
पण मनावर कोरलेले कसे खणून काढावं   …?
तुला काय माहीत   …
तू परत यावंस असं
वाटत होतं  पण   .... तेंव्हाच
नेमकं माझ्या अस्तित्वाचा
अर्थ बदलत होता    …!!!

                                            
                                                          " समिधा "