आकाश ढवळून वारा
पाऊस घेऊन येतो
तशी तुझी आठवण ...
मला ढवळून जाते...
असं ढवळणं बरं नाही...
त्याच्या सोबत राहून
मागचं गाणं गुणगुणत
तुझ्या पावसात भिजणं बरं नाही....!!
सारं मला कळतं,
वेळ आता निघून गेली ...
तरी मागच्या पानावर
ठेवलेली रेशीमखुण
मनातच रूतलेली
त्या गहि-या वेळांची
गाठ न सुटलेली ...
त्या वेळां, त्या खुणा
असं जपणं बरं नाही...
भुतकाळाच्या बोटांनी
वर्तमानाच्या पाठीवर
तुझं नाव गिरवणं बरं नाही.....!!
" समिधा "
मी शोधेन म्हणते तुलाच
सातजन्मांतरीच्या फे-यात
फेर नसावेत फक्त बंधनाचे
असावेत ते एखाद्या जन्मी
फक्त श्वास आदी अंताच्या पल्याड!!
मी मागते तुला पुन्हा पुन्हा
न उलगडलेला तू
आणि ......
न सापडलेली मी..
एकाच जन्मात...!!
तु भेटशील एखाद्या जन्मात
फक्त माझा , सखा होऊन
विमुक्त , शरिरापल्याड....!!!
" समिधा "
घन घन दाट झाले
ढगाळले , आत ओले
असा मनात आला भरून …
"सखा" उभा पाऊस होऊन …!!!
"समिधा "
का हळव्या भासती दिशा
सखे सांग ना तुला भेटूनी परतती
म्हणूनी विरहाची का बोलती भाषा..?
मी अबोल मनी येथे दाबतो हुंदका
अनं बांध घालीतो भावनांना
सखे सांग ना दिशेपलिकडे
आकाश आठवांनी दाटते का ?
मी उध्वस्थ मनाच्या तळाशी
फुलवतो गुलमोहराची वस्ती
मी उजळतो कोनाडे अंधारी
सखे सांग ना तुझ्याही अंगणी
बरसतेस ना प्राजक्ताच्या राशी ...?
मी इथे एकटा तू दूर अशी
आपल्यात पसरल्या दिशा
तू तिथेच उभी पहा
मी इथून तुला पहातो
सखे सांग ना सांजवेळी
स्पंदनेच ना मोहरली क्षितीजाशी ...??
समिधा
किती भेटी झाल्या
मोजदात नाही ....!!
त्या थांबल्या वेळा तिथेच
थोडया पापण्यांत कैद
अनं .... आलिंगनात काही ...!!
"समिधा"
तुझ्या घनओल्या
पापण्यांची व्यथा
सांगू नको .....!!
इथे शुभ्र
आकाश कोरड़ा
ओला श्वास
मागू नको। ...!!
" समिधा "
तुला शोधतांना
किती ओलांडल्या वेशी..
शोधी खुण गाठ
जी येई तुजपाशी...
काही थोडे पाश
उरलेत मजपाशी
जुळवून पाहीन
थोडे तुजपाशी....
कळावे माझे श्वास
आतूर भेटण्यास
ठेवते उच्छश्वास
ओळखीच्या उंब-याशी...
कधी जाशील तिथून
गंध घेशील उरी
पुऩ्हा भिडशील
माझ्या आठवांशी...
"समिधा"