माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६
वंचना ......!
काही श्वास उसाशात निघून जातात...
तुझ्यामाझ्या नात्यात उगीच
व्यर्थ अर्थ ठेवून जातात...!
जीव धपापतो जेव्हा तू दूर असतोस
निनावी वेदनेला कुरवाळत
मग अख्खे दिवस निघून जातात.....!
वाया जाण्यासाठीच असतात
कदाचीत काही श्वास....
तरून नेतात प्राण क्षणभर
वंचनेचा देऊन भास...!
नजर मेल्यावर पहाण्याला
तसा काही अर्थ नसतो...
समोर तू असलास तरी
तुझी नजर माझ्यावर
भार असतो...!!
" समिधा "
बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६
जरा जरासा तुझा विरह........!
जरा जरासा तुझा विरह छळतो आहे!
जरा जरासा तुझ्याशिवाय कळतो आहे!
फुकल्या सिगारेट कितीक वीरहात
धुरात तुझ्याच कविता वळतो आहे!
मी ढोसली दारू कितीक पोटात
ओठात तुझेच घोट गिळतो आहे!
मी फाडली फोडली चित्रे तुझी अवचीत
तीच आता इथून तिथून जुळवतो आहे!
तू हलकेच निघून गेली जेव्हा चुकवून वाट...
ती वाट पुन्हा पुन्हा न्याहळतो आहे!
तू दिसते जेव्हा जराशी हसतांना
हसण्यात त्या जरा जरासा पोळतो आहे!
का अडकतोय पुन्हा तुझ्या रेशीमबंधात?
मोहात मीच मला का घोळतो आहे!
पुरे झाला हा खेळ एकट्याचा
एकटा उगीच का मी जळतो आहे!
मीही मांडतो माझा डांव नवा
नव्या डावांत नवे गाणे जुळवतो आहे!
जरी कधी भेटलो चुकून कोठेही
भेट तशीच मजला जशी ओळखतो आहे!!
© "समिधा "
कुठले शब्द झेलावेत तुझे...?
किती आणि कुठले शब्द
झेलावेत तुझे...?
कोमल हळव्या शब्दांना...
फुलांसारखे जपते निरंतर
पण पेटते निखारे शब्द तुझे
विझवावेत कुठवर...??
तू फेकतो निर्दयतेने
माझ्यावर शब्द,
दगड फेकावेत तसे...
अनं मी झेलते कधी चुकवते...
एखादा बसतोच जीव्हारी..
मग वेदनांचा फुटतो टाहो
आत आत फाटत जातो
मनातला रेशीमपदर....!!
तुला कधीच कळणार नाही का..?
शब्दांनाही असते धार..
चिरतात ते आतला स्निग्धगर्भ
जिथून जन्म घेते..वाढत असते
नाते...!
जे कधीच नसते संपणार....!!
तू आधीच खुडून टाकतोस
कोवळी संवादाची वेल
आणि चर्चा करतोस
मोठ्या वडपारंब्यांच्या
वंशावर....!!
शब्दांचे हळवे स्वर
कधीतरी ऐक ना...
तुझ्यामागे भिरभरणा-या
कोमल फुलपाखराला
एकदातरी जप ना...
तुझ्या दाटगडद शब्दांनी
उडतो त्याच्या पंखांवरचा रंग
आणि मग निस्तेज फिक्कट
फिरत रहातं ते घरभर...!!
कधी विसरू नकोस
शब्दांना वेठीला धरून
तू मारलेला वाग्बाण
परत घेता येत नाही....
नाजूक शब्दांना गळ घालून
भरून काढ झालेले घाव...
शब्दांचं काय ....
त्यांना मी झेलावेत,टाळावेत
कधी विसरावेत
तुझ्यावरील प्रेमाखातर...!!!!
©. "समिधा "
शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६
ऐक नां........!!

ऐक नां...
थो...डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला ......!
घड्याळ्याच्या काट्याला मागे
करून माझा चेहरा पुढे आण..
खिडकीचा पडदा दूर सारून
बाहेरच्या मंद हवेला हळूच सांग
मला उठवायला ...!
आणि थो...डी....शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला .....!
मस्त गरम चहा आणि सोबत प्रेमळ हाक .....
खिडकीत सुंदर फुलपाखरं आणि
सोबत मोग-याचा सुवास.....
अधीर मनाला जरा सांग नं आवरायला....!
आणि थो....डी....शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला...!
असू देत ऑफीसला हजार कामं
आणि बॉसच्या मोबाईलचा
कलकलाट
त्या हजारांना शुन्यात आण
मोबाइला कर स्वीच्ड ऑफ अनं
माझ्यासाठी ह्रदयातून गां नं गझलचा
एक शेर एक मतला ....!
आणि थो....डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला...!!
तुझ्या शर्टचं तुटलेलं बटण
मी लावायला विसरले....
तुझ्या पांढ-याशुभ्र शर्टवर
माझ्या कपड्यांचा रंग लागला...
तू चिडू नकोस ....
फक्त ने नं
हसण्यावरी सगळ्याला....!
आणि थो....डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला ...!
काल भाजी तिखट आणि
पोळी वातड होती...
हे विसर आणि
म्हण नं त्या दिवशी तू गाजरचा
हलवा मस्त केला ......!
आणि थो....डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला..!
खोपातला पसारा
सोबत आपल्या चिमण्यांचा चिवचिवाट ....
एकदाच सारं घर गजबजून
जाऊ दे नं
उद्यापासून मी ड्युटीवर
तू फिरतीवर....
चिमणी पाखरांची नजर
आपल्या वाटेवर...
बघ नं किती आतूर आजचे क्षण
जगायला.....!
आणि थो....डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला...!!
"समिधा "
सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६
त्याच्या उबदार श्वासांवर.....

बहकलेल्या क्षणांना...फितून
जेव्हा तो जवळ आला
आणि माझी शुद्धही तेव्हा फितूर मला
तरिही.....
त्याच्या उबदार श्वासांवर
माझा ' विश्वास ' होता !!
"समिधा "
उगावावं म्हणते तुझ्यातून ...!
उगावावं म्हणते तुझ्यातून
म्हणजे तुझ्या वेदनेला
माझा सहनशीलतेचा देठ भिडेल
आणि तू मग सावलीतून फक्त शीतल
माया देशील ज्याची मला आता गरज आहे!
तुझ्या आतल्या पुरूषाला सांग ना
माझ्यातल्या अगणीत कवितांना तुझा
कोमल स्वर हवाय...!
देशील तू तुझ्यातल्या थोड्या अश्रुंना
माझ्या डोळ्यातल्या आसवांची साथ...!
फार नाही पण हसतांना तूला पहायचंय
तुडूंब भरलेल्या हंड्यातून उचंबळणा-या पाण्यासारखे
तुझ्या सुखाच्या कल्पना एकदा कैनव्हासवर उतरवून
त्यात रंग तूच भर
पण त्यामध्ये एखाददुसरी सुखाची नक्षी माझीही
सामील कर...!
तुझ्या जुन्या फोटोफ्रेममध्ये
अजुनही मला ब्लैकअँड व्हाईट
संदर्भ दिसतात....
काढू नकोस ते बाहेर ...
पण
तिथेच मलाही थोडे आत घे....
माझे सारे तूझ्यात सामावून जावे
असेच प्रयत्न करत आले
तरी मी अजुनही बाहेर आहे...
व्यवहार आणि विश्वास यात
तोलत ठेवून मला अजुनही तू
हिशोबात मांडतोस
पण ...
हिशोबात धरत नाहीस.....!!!!
© "समिधा "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)